कविता हा तसा अगदी व्यक्तिगत कलाप्रकार ; पण म्हणतात की आपण जितकं अधिकाधिक व्यक्तिगत लिहितो तितकं ते अधिकाधिक वैश्विक सत्य होत जातं. अलकाजी यांच्या कविता अगदी तशाच आहेत .जेव्हा कवी किंवा कवयित्रीचं मन भावनांनी ,विचारांनी, कल्पनांनी अगदी ओतप्रोत होतं तेव्हा पाण्याने भरलेल्या कृष्णमेघासारखं बरसण्याशिवाय व्यक्त होण्याशिवाय कसं राहू शकतं! किंबहुना त्यातच त्याची यथार्थता आहे. कवयित्रीच्या कविता वाचताना त्यातली प्रत्येक ओळ अगदी सहजतेने बरसणाऱ्या कृष्ण मेघा सारखीच अगदी नैसर्गिक, मोहक आणि शीतल वाटते. या कवितांमध्ये ठिकठिकाणी निसर्गातली अनेकविध रूपके आढळतात .जसे , "बकुळ बघ आरक्त झाला, माझ्या कुंतली माळतांना" किंवा " धरा वाट बघतेय तुझी, तिच्या गर्भारपणाचा सोहळा साजरा करायचाय अवनीवर.." अशी आणखीही कितीतरी !
ही नुसते निसर्गवर्णने नाहीत तर मानवी भावभावनांचं , स्वप्नांचं, आकांक्षांचं आरोपण निसर्गातल्या प्रतिमांवर केलं आहे त्यातून!-डॉ. राहुल जोशी