कालाधिष्ठित कथावस्तू, कथानक विकासाचे निश्चित टप्पे, घटनाबहुलता आणि रहस्यप्रधानता ही वैशिष्ट्ये असूनही जीएंची कथा कथानकनिष्ठ कथा होत नाही याचेही अंतिम कारण त्यांच्या कथेचा प्रतीकात्मक धर्मच. दृष्टिमापाने किंवा श्रवणमापाने दीर्घ आणि सैल वाटणाऱ्या जीएंच्या कथा प्रतीतीच्या दृष्टीने अतिशय बांधेसूद, अतिशय गोळीबंद, अतिशय दाट, सूक्ष्म आणि घट्ट विणीच्या असतात, फार घाटदार असतात.
भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेल्या ‘काजळमाया’ या संग्रहात वाचकांना भुरळ घालणाऱ्या ‘प्रदक्षिणा’, ‘अंजन’, ‘विदूषक’, ‘कळसूत्र’ अशा कथांचा समावेश आहे.