अवलिया हे पुस्तक आजवर लिहिलेल्या पुस्तकांपेक्षा खूप वेगळे आहे. संशोधक वृत्ती म्हणजे नक्की काय याचा तो आरसा आहे. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यावर त्याच्या पूर्ततेसाठी सर्व काही विसरून जाणे हे मी समजू शकतो पण रात्रंदिवस आपल्याला त्याच्यातच अखंडपणे बुडवून घेणे हे भल्याभल्यांना जमत नाही. शवविच्छेदनाची प्रक्रिया वेगवेगळ्या आजारांचा घेतलेला शोध आणि त्या प्रसंगी स्वत:चा गिनिपिग म्हणून केलेला वापर या सर्व गोष्टींमुळे जॉन हंटर हा मला एक आवलिया शास्त्रज्ञ वाटला. त्याच्या आयुष्यात हेवे- दावे, स्पर्धा, मत्सर, प्रेम या साऱ्या भावनांचे प्रतिबिंब उमटलेले दिसते.
पण मानवी भावना कमी महत्त्वाच्या मानून आपल्या कार्याला वाहून घेण्यात त्याने धन्यता मानली. रुग्णालयातील स्पर्धा, दोन सर्जनमधील वितुष्ट या साऱ्या गोष्टी आजही आढळतात. आढळत नाही ती ध्येयास वाहून घेणाची, आत्मार्पण करण्याची अलग वृत्ती, गुरु- शिष्य परंपरेला जपणारा असा हा अवलिया सर्जन. जॉन हंटर होता म्हणून एडवर्डं जेन्नर घडला. ही गुरु- शिष्यांची परंपरा आजच्या काळातील शिक्षक आणि विद्यार्थी नात्यालाही अलौकिक आशीर्वाद देते असेच मला वाटते.