आठवांचा इंद्रधनु" हे शीर्षक निवडण्याचे कारण म्हणजे यात सर्व प्रकारच्या माझ्या आठवणी आहेत. त्यातील काही खूप गोड, काही सुखद, काही दुःखद, काही मजेशीर, काही नात्यातील प्रेमाची घट्ट वीण दाखविणाऱ्या, तर काही चांगल्या सृजनात्मक कार्याचे कौतुक करणाऱ्या अशा आहेत. तर काही, मी इराक या देशात नियत कर्तव्य बजावत असताना तेथील स्थानिक इराकी नागरिकांनी मुक्त कंठाने एकंदरच भारतीय संस्कृती, परंपरा, द्विभार्या प्रतिबंधक कायदा यावर उधळलेल्या स्तुती सुमनांच्या अनुभवलेल्या रोमांचकारी आठवणी पण आहेत. म्हणूनच इंद्रधनुष्य हे जसे त्यातील सात विविध रंगांमुळे खुलून दिसते, मनोहर वाटते, नेत्रसुख देते तद्वतच माझ्या विविधरंगी आठवणींवर बेतलेला हा बारा लेखांचा संग्रह वाचकांना रुचेल भावेल आणि खिळवून ठेवणारा असा वाटेल या ठाम विश्वासाने, खातरीने मी माझ्या या लेख संग्रहाचे नामकरण "आठवांचा इंद्रधनु" असे केले आहे .