"जेष्ठ साहित्यिका सौ.भारतीताई सावंत यांचा 'मोरपंखी सृष्टी' हा पन्नास
कवितांचा संग्रह म्हणजे जणू सागराच्या तळातले अनमोल मोतीच ! यातील एक
कविता वाचली की, दुसरी कविता वाचण्याचा मोह आपसूकच वाचकाच्या मनात
निर्माण होतो! वाचकाच्या मनाला ओढ लावणार्या एकाहून एक सरस कवितांची
जणू अलवार पर्जन्यवृष्टीच प्रस्तुत काव्य संग्रहातून झाल्याचा भास वाचकांच्या
मनाला होतो. जीवनातील वास्तविकता सांगणार्या 'शेतीमाती', 'निसर्ग', 'सासर',
'माहेर', 'शिक्षण', 'प्रेम', 'अंधश्रद्धा', 'मैत्री', अशा कितीतरी बहारदार, विविधता पूर्ण,
सुंदर कवितांची चपखल शब्दांत, हृदयाच्या शिवारात खोलवर पेरणी करून
समाधानाचे हिरवे पीक वाचकांच्या अवती-भवती डोलायला लागते. साध्या सरळ
मनाला पटेल-रुचेल अशा ओघवत्या लयबद्ध शब्दांची अचूक, सहज, सुलभ आणि
सुंदर मांडणी हे सौ. भारतीताईच्या लेखणीतले विशेष कसब प्रस्तुत 'मोरपंखी
सृष्टी' या काव्य संग्रहातून दिसून येते.