लेखिकेचे बालपण खेड्यात गेले आहे. त्यामुळे त्यांच्या तिथल्या अनुभवांचे हुबेहुब चित्रण ठिकठिकाणी आढळते. खेड्यांचे शहरीकरण होत आहे हे लक्षात आल्यावर यावर त्या स्वयंउद्योजिकतेचा पर्याय सुचवतात. तेथील तरूणांनी शेतीविषयक शिक्षण घेऊन त्यात सुधारणा घडवून आणता येईल हा आशावाद त्यांच्या मनात आहे. 'नाळ मातीशी' या लेखात..त्यांनी खेड्याशी नाळ जोडलेली राहावी म्हणून संदेश दिला आहे. आजूबाजूला घडत असलेल्या घटना, प्रसंग प्रासादिक भाषेत, विविध अलंकारांचा वापर करून वाचकांच्या मनावर अलौकीकरित्या परिणाम उमटवला आहे. त्यांनी प्रत्येक लेखात सुंदर लालित्यपेरणी केली आहे. अप्रतिम सुविचार, म्हणी अगदी चपखलपणे त्यात वापरल्या आहेत. स्वलिखित चारोळ्यांचा त्यात समावेश आहे. ज्ञान आणि मनोरंजन यांचा अप्रतिम अनुबंध प्रत्येक लेखात आहे. लेख वाचतांना पुढे काय असेल याची उत्सुकता वाटत राहते. त्यांच्या लेखातील उदाहरणेही आपल्याच जीवनातील आहेत की काय असेही वाटून जाते.
-नीलिमा नातू
निवृत्त मुख्याध्यापिका,
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था.