"आपण अनेकदा भुतांच्या गोष्टी ऐकलेल्या असतात. पिशाच्च, पुनर्जन्म यावर काहीजणांचा विश्वास असतो पण बऱ्याच जणांचा विश्वास नसतो. तरीही त्याबद्दल त्यांना कुतूहल असते. त्यामुळे बऱ्याच जणांना गूढकथा वाचायला आवडतात. गूढकथा लिहिणे सोपे नसते. गूढकथा लिहिण्याची एक विशिष्ट शैली आहे. ती शैली लेखिका सौ.संपदा राजेश देशपांडे यांनी आत्मसात केली आहे असे मला वाटते. या सर्व कथांमधील गूढता वाढवण्यासाठी लेखिकेने कुठेही अतिरंजित शब्दयोजना केली नाहीये. साध्या व सुबोध शब्दांत त्यांनी कथेत रंजकता निर्माण केली आहे. आपल्या आजी आजोबांनी जश्या आपल्या नातवंडांना भुताच्या किंवा गूढ गोष्टी सांगाव्यात तश्या लेखिका आपल्याला या कथा सांगत आहेत असे वाटते. प्रत्येक कथेतील रहस्यमयता टिकवून ठेवण्यात व वाचकांची उत्कंठा वाढवत नेण्यात लेखिका यशस्वी झाल्या आहेत. लेखिकेने काही कथांचा शेवट आनंदी केला आहे तर काही कथांचा विस्मयकारक.
काही कथांमध्ये त्यांनी अशी काही कलाटणी दिली आहे की, त्या पिशाचांचा नायनाट झाला आहे की नाही असा संभ्रम वाचकांच्या मनात निर्माण होतो. मनमोहिनी या कथेत लेखिका आपल्याला भूतकाळात घेऊन जातात तर भुताच्या गोष्टी या वर्तमानातील कथेचा शेवट धक्का देणारा आहे. प्रत्येक कथेत लेखिका वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. या सर्व कथा काल्पनिक आहेत तरीही त्या वाचताना आपण त्यात समरस होऊन जातो.- अजित महाडकर (कवी, हायकूकार)