विषयांचे वैविध्य, समस्यांच्या निराकरणासाठी काय करता येईल याचा ऊहापोह, साधे-सोपे शब्द आणि चपखल उदाहरणे या सोबतच योग्य त्या भाषेचा प्रयोग हे या लेखसंग्रहातील लेखांचे वैशिष्टय म्हणावे लागेल. या लेखसंग्रहातील लेखांचे विषय बघितले तर लेखिकेने ते निवडून समाज आणि आपला देश यांच्याशी आपल्या असलेल्या ऋणानुबंधाचेच भान ठेवले आहे असे म्हणावेसे वाटते. त्यामुळे पुस्तकाचे ‘ऋणानुबंध’ हे शीर्षक समर्पक वाटते. बहुतेक सगळयाच लेखांमध्ये चारोळयांचा उपयोग केलेला दिसतो. लेखामध्ये आपल्याला जे सांगायचे आहे ते लेखिकेने या चारोळयांतूनसुध्दा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. वाचकांना एकाच पुस्तकात लेख आणि चारोळया यांचा आस्वाद घेता येऊ शकेल. या संग्रहातील कुठलाही लेख काढावा आणि त्यावर चिंतन करावे अश्या पद्धतीने हे पुस्तक वाचल्यास लेखिकेचा या लेखनामागील उद्देश सफल होऊ शकेल असे मला सुचवावेसे वाटते.-सुधीर मुळे, कादंबरीकार आणि कथालेखक