तसं पाहिलं ना तर आपल्या आजुबाजुला सतत कांही ना कांही घटना घडतच असतात. त्या घटनांची स्पंदने कमी अधिक प्रमाणात आपल्या मनात रूजत जातात. सामान्य माणसाच्या मनातून ही स्पंदने काही काळानंतर विसरली जातात पण सृजनशील व्यक्तिच्या अंत:करणात या घटनांचे ठसे उमटलेले असतात आणि कालांतरानं विचार आणि कल्पकतेचे लेणे लेवून, या च घटना कथेच्या स्वरुपात फलित होऊन आकारास येतात आणि पुन्हां सामान्य माणसांच्या अंत:करणाला झंकृत करुन जातात. याचाच अर्थ,कथा म्हणजे दुसरे तीसरे काही नसून आपल्याच आजूबाजूला घडणा-या घटनांचे पडसाद असतात आणि म्हणूनच कदाचित् साहित्यातला 'कथा' हा प्रकार जन मानसाला विशेष भावतो, आपलासा वाटतो.
कारण सर्जका साठी असं म्हटलं जातं की,
'तुम्ही शब्द वापरता
तो शब्दात भिजून येतो
तुमचे शब्द सांगून संपतात
पण तो शब्दात रूजून येतो'
प्रस्तुत पुस्तकातल्या माझ्या या कथा म्हणजे देखील अशीच कुठेतरी, कधीतरी मनात रूजलेली बीजं आहेत.
या कथेतली बरीचशी पात्रं मला माझ्या आयुष्याच्या वळणांवर कुठे न कुठेतरी भेटलेली आहेत.तर काही घटना अशा आहेत की ज्यांनी मला आतून अगदी अस्वस्थ केले आहे आणि या अस्वस्थतेतूनच काही कथा साकार झाल्या आहेत.एकूण काय! भेटलेली माणसं, भावलेले, न भावलेले प्रसंग, घटना या कथांच्या स्वरुपात चित्रित झालेल्या आहेत.
-जयश्री जोशी