"//....२० डिसे १९७६
आमच्या होस्टेलच्या रेक्टर बाईंची मी लाडकी विद्यार्थिनी म्हणून माझ्या वाढदिवसा निमित्त त्यांनी मला ही डायरी भेट दिली. “ बाई मला कोणी मैत्रीण नाही. ह्या सगळ्याजणी मला पुस्तकी किडा म्हणतात.मझ्याशी नीट बोलत नाहीत. बाई तुम्ही व्हाल माझी मैत्रीण? म्हणजे इतर मैत्रीणीना माझा खूप हेवा वाटेल. त्या मला चिडवण बंद करतील.” बाई फक्त हसल्या आणि निघून गेल्या. आज हातात डायरी ठेवताना म्हणाल्या, ‘”तुझी खरी मैत्रीण हीच होईल , तुझ्या जे काही मनात येत ते ह्या डायरीत लिहित जा.” आज मी खूप आनंदी आहे. मेसच्या शांताबाई यांनी माझा वाढदिवस म्हणून जेवायला गुलाबजाम केले होते. दादाच एक सुंदर बाहुली असलेल ग्रीटिंग मला पोस्टाने आल आहे आणि बाईनी किती छान डायरी दिली आहे. डायरीच्या प्रत्येक पानावरती खाली छान छान सुविचार आहेत. पानाला सोनेरी कड आहे. डायरी उघडून आधी त्यावर ‘श्री’ कोरला. नाव टाकून दिल. आणि केली सुरुवात लिहायला. ..//.........तिच्या डायरीतून "