"वृत्तपत्र हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. राज्य, देश प्रदेश, जग, यातल्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचतात त्यामध्ये वर्तमानपत्रे खूप मोठी भूमिका बजावतात. पेपर बघितल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. बातमी पुरवणारी अनेक माध्यमे आता उपलब्ध आहेत. तरी वर्तमानपत्र हे अजूनही सर्वात जास्त विश्वासार्ह समजले जाते. वृत्तपत्रात अग्रलेखाला अनन्यसाधारण महत्त्व असते. वृत्तपत्राच्या ध्येय धोरणानुसार बातमी दिली जाते. बातमीतली, घटनेतली सत्यासत्यता पडताळणी जाते.. तितकाच महत्त्वाचा असतो अग्रलेखाच्या बाजूचा लेख. त्याला सेकंड आर्टिकलही म्हणतात. समाजातल्या ज्वलंत विषयावर आसूड ओढले जातात. चर्चा घडते. उहापोह होतो.
""सारांश"" हे श्री दिलीप देशपांडे यांच्या अशाच लेखांचे एक अप्रतिम असे संकलन आहे. त्यांचे लेख मी नेहमीच वाचत असतो, ते आस्वादकाच्या भूमिकेतून. पण आता श्री देशपांडे मला चिकित्सक करत आहेत. अर्थात दोन्ही भूमिका मला आनंद देतात.
या 21 लेख संग्रहाच्या पुस्तकात अग्रस्थानी आहे शेगांव निवासी गजानन महाराज यांचा प्रकट दिनानिमित्त लिहिलेला लेख."